
मागील काही वर्षांत विद्यार्थी चळवळ ही कधी नव्हे इतकी सातत्याने चर्चेत येत आहे. विद्यार्थी जो समाजकारण आणि राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे तो आज चळवळीत सक्रीय होत आहे ही भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात सुखद बाब आहे. कोणत्याही देशाच भविष्य हे त्या देशाचे विद्यार्थीच ठरवत असतात म्हणून उमदे, कर्तुत्ववान व तितकेच प्रगल्भ विद्यार्थी घडवणे सरकारचे पर्यायाने समाजाचे दायित्व असते. परंतु या देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यार्थ्याला आणि त्याच्या प्रश्नाला कधीच गंभीरपणे घेतले गेले नाही हि आपल्या देशाची शोकांतिका आहे. विद्यार्थ्याला काय हवं आहे त्याची मानसिक आणि बौद्धिक निकड काय आहे याकडे कोणालाही लक्ष देण्याची गरज वाटली नाही. म्हणूनच कि काय आजचा विद्यार्थी शिक्षणव्यवस्था, सरकार, यंत्रणा यांच्या विरोधात बेधडकपणे उभा राहत आहे. याच विद्यार्थी चळवळीतून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे अनेक राजकीय धुरंधर आपल्या देशाला लाभले आहेत. आज बऱ्यापैकी बहरात असलेल्या विद्यार्थी चळवळीच्या प्रारंभापासून केलेली ही मीमांसा.
भारतातील विद्यार्थी चळवळीचा इतिहास
भारतातील विद्यार्थी चळवळीचा इतिहास साधारणपणे १७० वर्षे जुना आहे. दादाभाई नौरोजी यांनी सन १८४८ मध्ये ‘स्टुडंटस सायंटिफिक एंड हिस्टोरिक सोसायटी’ नावाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक समूह बनवला होता. आठवड्यातून एक दोन वेळा एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करणे अस एकंदर याचं स्वरूप होतं.
ब्रिटीश काळात ‘किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज, लाहोर’ च्या विद्यार्थ्यांनी वर्णभेदा विरुध्द केलेलं यशस्वी आंदोलन ही खऱ्या अर्थाने भारतातील विद्यार्थी चळवळीची नांदी म्हणावी लागेल.
अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत देखील सक्रीय सहभाग नोंदवला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाविद्यालयीन तरुणांना एकत्र करून विदेशी कापडांची होळी केली व स्वदेशीचं युध्द छेडलं.
त्याचबरोबर भारत छोडो, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग अशा प्रत्येक चळवळीत विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभागी झाले.
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विद्यार्थी चळवळ
स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमात्र उद्दिष्ट ठेऊन विद्यार्थी संघटनाही कार्यरत होत्या. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही देशासमोरील प्रश्न संपत नव्हते. प्रत्येक प्रश्नावर उस्फुर्तपणे विद्यार्थी काम करत होते. पर्यावरण विषयक चिपको आंदोलन असो कि इंदिरा गांधीनी लादलेल्या आणीबाणी विरोधी आंदोलन. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने तर विद्यार्थ्यांची एक उमदी पिढी राजकारणात सक्रीय झाली. अशा शेकडो आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे. तसेच आजच्या राजकारणात सक्रीय असलेले बहुतांशी नेते विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आलेले आहेत.
विद्यार्थी चळवळ आजच्या दृष्टीकीनातून
भारतातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेने आश्रय दिलेली शिक्षण व्यवस्था देखील तितकीच भ्रष्टाचारात बरबटलेली आहे. शेकड्याने तयार झालेले शिक्षणसम्राट विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत. सगळी विद्यापीठ ही शिक्षण सम्राट धार्जीन धोरण राबवतात. विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी सरकारकडे कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. तसेच विद्यार्थी संरक्षण कायदा देखील अस्तित्वात नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी संघटनांशिवाय पर्याय उरत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणाऱ्या संघटनांचं उभं आडवं मोजमाप घेण देखील महत्वाच आहे.
कोणतीही चळवळ, संघटना खूप काळ रेंगाळली कि तिच्यावर एक मळभ चढत ती स्वतः च महत्व हरवू लागते. तसच काहीतरी आजच्या विद्यार्थी चळवळी बद्दल झालेलं दिसत. विद्यार्थी हिताच्या व्यापक दृष्टीकोनातून सुरु झालेली विद्यार्थी चळवळ आज मुख्य ध्येयापासून विचलित झाल्या सारखी भासत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून यावा चर्चा व्हावी या उद्देशाने प्रेरित होऊन दादाभाई नौरोजी यांनी पेरलेल विद्यार्थी संघटनेच बीज आणि त्याचाच वृक्ष झालेल्या आजच्या विद्यार्थी संघटना यात कमालीचा विरोधाभास दिसून येतो. विविध विचारसरणी च्या विद्यार्थी संघटनांमधील वैचारिक मतभेदातून होणाऱ्या हाणामाऱ्या हे चळवळ भरकटल्याच लक्षण आहे.
आज कॉलेज कॅम्पसेस मध्ये शेकड्याने विद्यार्थी संघटना अस्तित्वात आहेत. जवळपास प्रत्येकच राजकीय पक्षाची विद्यार्थी संघटना नावाला का होईना अस्तित्वात आहे. प्रत्येक संघटनेची ध्येय धोरण, विचारसरणी, कार्यपद्धती वेगळी आहे. आज या सर्व संघटनांमध्ये एक साधर्म्य आढळून येत ते म्हणजे यांमध्ये विद्यार्थी हित जोपासण्या ऐवजी विचारसरणीचा प्रसार जास्त महत्वाचा आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हा विचार समोर ठेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याच दुर्दैवी काम राजकीय पक्षांमार्फत केल जात आहे. ही गोष्ट विद्यार्थी चळवळीच्या भविष्याला कुठ तरी नक्कीच मारक आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेणारा विद्यार्थी हा कोऱ्या पाटिसारखा असतो त्याच्यावर आपल्या विचारसरणीच्या रेघोट्या मारण्याची घाई प्रत्येक संघटनेला झाली आहे. त्यातूनच दुसर्या विचारसरणीचा द्वेष देखील पेरला जातो. संवाद घडण्य ऐवजी विसंवाद घडतो यातूनच द्वेषाला खतपाणी मिळत.
महाविद्यालयात केवळ अभ्यास एके अभ्यास नसावा त्यातून एक परिपूर्ण असा विद्यार्थी घडावा, त्याला राजकीय, सामाजिक विषयाची जाण असावी. त्यातूनच एक सक्षम, सहिष्णू समाज निर्माण होत असतो. विद्यार्थ्यांमध्ये मतमतांतरे स्वीकार्ह आहेत किंबहुना ते असलेच पाहिजेत पण त्यातून होणारे मनभेद अपेक्षित नाहीत. महाविद्यालयातील वातावरण सुदृढ असाव ज्यात सर्व विचारसरसरणीच्या संघटनांचे प्रतिनिधी एकत्र यावेत विद्यार्थी हिताचा संवाद घडावा त्यातच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यचं हित समावल आहे. विचारांचा विरोध विचारानेच करण्याची मानसिकता असायला हवी, परंतु आजच्या विद्यार्थ्यी संघटना एकमेकाचे टाळके फोडण्यास हयगय करत नाहीत यापेक्षा मोठ दुर्दैव नाही. झालेल्या भांडणातून दाखल झालेले गुन्हे हे विद्यार्थ्यचं शैक्षणिक आयुष्य बरबाद करणारे असतात परंतु ते एखाद्या मेडल सारखे मिरवले जातात.
कोणाचही मत आपल्यापेक्षा वेगळ असूच नये हा विचार देशाच्या वैचारिक सहिष्णुतेला मारक आहे. भारतासारख्या धर्म पंथ प्रांत भाषा अशा प्रत्येक गोष्टीत वैविध्य असलेल्या देशात आपण एकच विचारसरणी असण्याची अपेक्षा करू शकत नाही. समाजाच्या विकासासाठी प्रत्येक विचार महत्वाचा आहे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. कारण लहान वयातच आलेली वैचारिक कट्टरता व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासाला बाधक आहे.
विद्यार्थी चळवळीतून आलेल्या नैराश्यातून रोहित वेमुला सारख्या विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या असेल वा उत्तरप्रदेश मधील महात्मा गांधी कशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष राम प्रकाश पांडे याची झालेली हत्या असेल हे आजच्या विद्यार्थी चळवळीचे अधःपतन आहे.
खुल्या विद्यापीठ निवडणुका
महाराष्ट्रात विद्यमान सरकारने नवीन विद्यापीठ कायदा लागू केला आहे ज्यात सन १९९४ साला पासून बंद असलेल्या खुल्या विद्यार्थी निवडणुका पुनःश्च एकदा सुरु करण्याचा अंतर्भाव आहे. या निवडणुका राजकीय पक्षांचे आखाडे होऊ नयेत यासाठी सरकार ला फार मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवावी लागणार आहे. आणि या निवडणुका फक्त विद्यार्थ्यांच्याच कश्या राहतील यासाठी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा ज्या कारणाने १९९४ साली खुल्या विद्यार्थी निवडणुका बंद कराव्या लागल्या होत्या त्या इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे.
विद्यार्थ्यांनी वैचारिक कट्टरता नं बाळगता परिवर्तनशील राहण किंवा वैचारिक लवचिकता दर्शविणे अधिक गरजेच आहे. त्याच बरोबर चळवळीत काम करताना अभ्यास, विद्यार्थी हित व देशभक्ती या गोष्टींवर कधीही तडजोड करू नये तरच चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल.
अक्षय बिक्कड
फर्ग्युसन महाविद्यालय पुणे