Saturday 28 October 2017

गरज वैचारिक सहिष्णुतेची...

 आपला भारत देश सर्वांगाने विविधता पूर्ण आहे. आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती नुसार  लोकांचे राहणीमान, धर्म, जात, रूढी-प्रथा, ईश्वरवाद, खाद्य संस्कृती, भाषा, अस्मिता, इत्यादी प्रत्येक गोष्टींमध्ये कमालीचे वैविध्य आढळते. स्वातंत्र्य चळवळीचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक राज्याचा इतिहास देखील वेगळा आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर साठ वर्षांनी देखील आपल्या प्रादेशिक अस्मिता तितक्याच किंबहुना अधिक टोकदार बनल्या आहेत.
 स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व तात्कालिक पर्यायाच्या अभावामुळे नेहरू-पटेल प्रणीत कॉंग्रेस वगळता इतर कोणत्याही राजकीय  अथवा बिगर राजकीय संघटनेला खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर संघटनात्मक जाळे विणता आले नाही. याचीच परिणती म्हणून आज स्वबळावर कोणताही पक्ष दिल्लीची सत्ता हस्तगत करू शकत नाही. याच्या अनेक कारणांपैकी महत्वाच कारण म्हणजे प्रचंड वैविध्य असलेल्या देशात सरसकट एकच अजेंडा राबवणे शक्य नाही कारण प्रत्येकाची आपली एक विचारसरणी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर विविधता असलेल्या देशात वैचारिक विविधता असणं देखील स्वाभाविक आहे.
   भारतात आजवर या सर्व विचारसरणीचे पाईक एकमेकांप्रती सहिष्णू भावना बाळगून असत. कारण विचाराधारे पेक्षा देश आणि माणुसकी महत्वाची आहे हे जाणण्या इतपत वैचारिक समज त्या लोकांना होती. विचारांचा विरोध विचारांनी करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीच्या ज्ञात इतिहासापासूनच चालत आलेली आहे. आद्य शंकराचार्य आणि मंडण मिश्र यांच्यातील प्रसिद्ध वादविवाद असेल किंवा चार्वाकाच्या नास्तिक दर्शनाचे भारतीय दर्शनाशास्त्रात असलेले महत्व असेल याला आद्य वैचारिक प्रगल्भतेचं उदाहरण म्हणता येऊ शकेल.
   परंतु दुर्दैवाने आजच्या काळात वैचारिक प्रगल्भता कमी झाली आहे आणि त्याची जागा वरचेवर कट्टरतेने घेतली आहे. सर्वात सुशिक्षित असलेल्या केरळ राज्या मध्ये विचारसरणीच्या नावाखाली सर्वाधिक जास्त बळी गेले आहेत. केरळ मध्ये जानेवारी १९९५ पासून  आजवर ९६ राजकीय हत्यांची नोंद झाली आहे यातील हत्या झालेल्या पैकी ४२ कार्यकर्ते संघ परिवाराशी संबंधित होते तर ४० मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. या रक्तरंजित वादात आजवर सहाशे पेक्षा अधिक लोकांवर खटले सुरु आहेत. या होणाऱ्या हत्यांसाठी दोन्ही संघटना आणि विचारधारा तितक्याच जबादार आहेत. संघासारख्या संयमी आणि भारतीय विचारसरणीचे पाईक म्हणवल्या जाणाऱ्या संघटनेचे नेते कुंदन चंद्रावत यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या शिरावर एक कोटीचा इनाम जाहीर करून आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली होती. विचारसरणीच्या नावाखाली मरणाऱ्यांच्या आणि त्या खटल्यात शिक्षा भोगणाऱ्यांच्या दोघांच्या परिवारांची साधी विचारपूस करायला देखील त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला नंतर वेळ नसतो. यात नुकसान होतं ते क्रांती किंवा देशभक्तीच्या भूलथापांना बळी पडलेल्या सर्वसाधारण कार्यकर्त्याचं.
  आपल्या देशातील प्रत्येक घटकाने, धर्माने, प्रांताने आपल्या विचारसरणीचा स्वीकार करावा यासाठी पराकोटीचा खटाटोप सुरु आहे. यामध्ये माणुसकी संपत आहे याचे देखील भान विचारांच्या ठेकेदारांना नाही. यांच्या वैचारिक संघर्षात आजवर हजारो निष्पाप लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे ‘अशोक परमार’. आपल्या पैकी बहुतेक लोकांनी या व्यक्तीचं नाव ऐकलेलं नाही परंतु त्यांचा फोटो मात्र प्रत्येकानेच पाहिलेला आहे. 

हो गुजरात दंगलीत हिंदू दहशतवादाचा चेहरा म्हणून जगभरातील मिडियाने घराघरात पोचवला आहे. बेघर असलेला अशोक परमार रस्त्यावर कामाच्या आणि अन्नाच्या शोधात फिरत असताना त्याला जेवण आणि पैशाच्या बदल्यात फोटो जर्नालीस्ट सेबेस्टीयन डिसुझा यांनी दंगेखोराची पोज द्यायला सांगितली. काम ठप्प असल्याने हातावरचे पोट असणारा अशोक फोटो साठी तयार झाला. दुसऱ्याच दिवशी जगभरातील वर्तमानपत्रात हिंदू दहशतवादाच्या मथळ्याखाली त्याचा फोटो छापून आला. याच फोटो ला पुरावा समजून पुढे त्याला पोलिसांनी अटक केली, खटला भरला परंतु पुराव्या अभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. स्वतः पत्रकार डिसुझा यांनी देखील त्याला दंगलीत सहभागी असलेलं किंवा जाळपोळ करताना पाहिलं नसल्याच सांगितल.
इस्लामिक आतंकवादावर पांघरून घालून हिंदू दहशतवादावर चर्चा घडवून आणण्याच्या मानसिकतेतून व स्वतः च्या निधर्मीपण सिद्ध करण्यासाठी पत्रकार डिसुझा यांनी एका निष्पाप व गरीब तरुणाचे आयुष्य बरबाद केल आहे.
   आजच्या देशाची शोकांतिका म्हणजे समाजावर प्रभाव असणाऱ्या सर्वच व्यक्ती विचारसरणीच्या कंपूत विभागलेल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या कंपूशी इमानदारी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यात सर्वात आघाडीवर आहेत ते पत्रकार. भारतीय पत्रकारितेत डावे आणि उजवे अशी उभी फुट पडलेली आहे. NDTV आणि झी न्युज ने अक्षरशः पक्षपातीपणाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याला मराठी माध्यमे देखील अपवाद नाहीत. इथेही प्रत्येकानेच आपला स्वामी निवडलेला आहे. माहिती पसरवण्याचे उद्दिष्ट असलेली मिडिया आज फक्त आपापल्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी वापरली जात आहे.
   विचारसरणीच विष इथवर थांबत नाही. ते नवीन पिढ्यांच्या नसानसात घुसवण्यासाठी हेच विचारधारेचे ठेकेदार विविध संघटनांच्या रुपात कॉलेज कॅम्पस मध्ये घुसून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत, त्यांचा गैरवापर करत आहेत. याचं ताज उदाहरण म्हणजे रोहित वेमुला. हैदरबाद विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केली. एका तरुण विद्यार्थ्याने अशा प्रकारे हतबल होऊन आत्महत्या करण हे दुर्दैवी आहे. परंतु ज्या संघटनेसाठी त्याने त्याचा अमूल्य वेळ खर्ची घातला त्याच संघटनेन त्याच्या मृत्यचं किळसवाण राजकारण केलं. त्याची सुसाईड नोट जाणून बुजून लपवून ठेवली. त्याच्या जातीचं राजकारण केल. तो दलित नसताना त्याला दलित संबोधून देशातील दलित जनतेची दिशाभूल केली. ज्यावेळी त्याच्या परिवाराला सांत्वनाची आधाराची गरज होती तेव्हा त्याच्याच मृत्युवरून राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न हे ठेकेदार करत होते. यावरून यांची संवेदनशीलता आपल्याला कळू शकते.
याच बरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला विद्यार्थी नजीब देखील त्याच्याच संघटनेच्या सांगण्यावरून पळून गेल्याचंही आता समोर येत आहे. अशा घटनात विद्यार्थी संघटनांच्या हातचे बाहुले बनून राहत आहेत. यात आपल्या युवा पिढीचे अतोनात नुकसान होत आहे.
   आज शिक्षण क्षेत्रात अनेक मुलभूत बदल अत्यावश्यक आहे. विज्ञानाभिमुख व संशोधनाला चालना देणाऱ्या शिक्षण यंत्रणेची गरज आहे. आज देशातील मुठभर विद्यापीठे सोडले तर बाकीच्या विद्यापीठांचे संशोधनातील योगदान शून्य आहे. कोट्यावधी रुपये खर्चून देखील महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच शेतीतील संशोधन नगण्यच आहे. त्या सुधारणा करायचे बाजूला ठेऊन सरकार त्यांना सोयीस्कर असलेला इतिहास मांडण्यात मग्न आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
   आज आपल्या देशात महत्वाचे मुद्दे बाजूला ठेऊन गो हत्ये वर चर्चा घडवली जात आहे. दोन्ही बाजूचे नेते वादग्रस्त वक्तव्य करून लोकांची कट्टरता वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु आजवर देशातील हिंदूंना गोहत्येच विशेष अस वावडं कधीच नव्हत. मग आज अचानक या मुद्द्यावर रक्त सांडायची काय गरज आहे. सुरुवातीला जरशी गायीला दुध देणारं गाढव म्हणून हिणवणाऱ्या आणि स्वदेशी जागरण मंच द्वारे तिचा विरोध करणाऱ्या संघाला अचानक जरशा गाई मध्ये सुद्धा माता दिसायला लागली हे आश्चर्यच आहे. हिंदु धर्मात देशी गाईला पवित्र मानलं आहे म्हणून मुसलमान किंवा इतर धर्मीय लोकांनी देखील पवित्र मानलं पाहिजे असा हट्ट करणे म्हणजे हिंदूंनी देखील मक्केला गेलच पाहिजे असा हट्ट करण्यासारखं आहे. इतकेच नव्हे तर तथाकथित हिंदू राष्ट्रवादी असलेल्या मोदी सरकारच्या काळात देखील कत्तलखान्यांना भरगोस सवलती दिल्या आहेत. यावरून त्यांची दांभिकता आपल्याला कळून येऊ शकेल. म्हणून भावनेच्या भरात गोरक्षक बनण्या आधी या गोष्टींचा विचार करा.
   डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले अशा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अशिक्षित बुरसटलेल्या समाजाला योग्य दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे. आजच्या तुलनेत त्या काळात समाज प्रबोधन करणे अवघड होते तरीही लोकांचा विरोध न जुमानता त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. परंतु आजच्या सुशिक्षित समाजात धर्मातील कुप्रथा, ढोंगी बाबा, चालीरीती इत्यादी गोष्टी बंद करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या दाभोलकरांची दिवसा ढवळ्या हत्या होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. दाभोलकरांची झालेली हत्या ही महाराष्ट्राचे वैचारिक अधःपतन आहे.
 सनातन संस्था, संभाजी ब्रिगेड सारख्या मुलतत्ववादी आणि द्वेषमुलक संघटनांमुळे शांत संयमी आणि सहिष्णू असलेला भारतीय समाज हकनाक बदनाम होतो आहे. म्हणून यांच्या विचारांचा विरोध करण आणि ढोंग उघड पाडण आवश्यक आहे.
  आजच्या तरुणाईने, नव्या पिढीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि कोणत्याही वैचारिक चळवळीच्या पखाली वाहिल्याने देश पुढे जाणार नाही तर आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने आपले आणि देशाचे भविष्य उज्वल राहणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील बहुतांश जनतेला कोणत्याही विचारधारेशी काहीही सोयरसुतक नाही. कारण अर्धपोटी माणसाला कोणत्याही विचाराची गरज नसते तर भाकरी ची गरज असते कारण त्यांचा एकच धर्म असतो तो म्हणजे भूक.
बदलत्या काळात आपण एक गोष्ट नक्कीच विसरत आहोत ती म्हणजे
“धर्म माणसासाठी असतो माणूस धर्मासाठी नसतो.”

सदरील लेख साहित्य चपराक च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.