Wednesday 8 November 2017

रशियन राज्यक्रांतीच्या शंभरी निमित्ताने…

नोव्हेंबर महिन्यात रशियात झालेल्या लाल क्रांतीला शंभरी पूर्ण झाली. भांडवलशाही ला प्रतिक्रिया म्हणून पुढे आलेल्या साम्यवादाने बलाढ्य रशियाला काय दिले आणि भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशाने त्यातून काय धडा घेतला पाहिजे…
प्रत्येक देश हा मुख्यतः तीन व्यवस्थांमध्ये विभागलेला असतो पहिली म्हणजे राज्यव्यवस्था, दुसरी समाजव्यवस्था आणि शेवटची अर्थव्यवस्था.
समाजव्यवस्था हि त्या त्या देशाच्या ऐतिहासिक, मानसिक, आणि भौगोलिक स्थितीवरून ठरत असते. अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था निवडण्याचे देशाला स्वातंत्र्य असते. त्याचे वेगवेगळे पर्याय जगापुढे आहेत. त्यातला सर्वात नवीन पर्याय म्हणजे जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स याने मांडलेला साम्यवाद किंवा कम्युनिजम.
तस पहायला गेलं तर धर्मनिरपेक्षतेची, समानतेची भाषा करणारा साम्यवाद फारच आकर्षक वाटण्याजोगा आहे. एकेकाळी अख्या जगाला व्यापून टाकण्याची स्वप्न पाहणारा साम्यवाद ५ देशांच्या सीमेपुरताच मर्यादित राहिला आहे. आणि त्यातही चीन मध्ये राजकीय साम्यवाद आर्थिक भांडवलशाही सोबत नांदत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारी पण लंगडी वाटणारी लोकशाही आणि उरावर बसणारा पण मोहवणारा साम्यवाद यांची साम्यवादाचा इतिहास वाचून आणि लोकशाही देशात जगून केलेली मीमांसा.
जरी लोकशाही मध्ये एकंदर समाजाचा, देशाचा विकास झपाट्याने होत नसला तरीही समाजातील लोकांना स्वातंत्र्य अनुभवता येते. त्यामुळे निश्चितच लोकशाही उजवी ठरते. कारण स्वातंत्र्य विकासापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.
समाजाचा किंवा एकंदर देशाचा विकास म्हणजे नेमक काय?
विकास हि एक सापेक्ष कल्पना आहे. विकास मोजण्याचे वेगवेगळे परिमाण आहेत, त्यामुळे विकासाच्या अनेक व्याख्या शक्य आहेत. “समाजातील प्रत्येक घटकाच्या दैनंदिन जीवनात आलेला सकारात्मक बदल” अशी विकासाची ढोबळ व्याख्या केली जाऊ शकते.
परंतु लोकशाहीतील बहुतांश घटकांना एकाधिकारशाही खुणावत असते. विशेषतः विशीतील तरुणांना समाजात असलेली विषमता आणि सरकारी कामातील धीमेपणा विरुद्ध चीड असते. ते असण थोडफार स्वाभाविक देखील आहे. आणि त्यातल्या त्यात जर सरकार नाकर्ते आणि भ्रष्ट असेल तर मग क्रांती जास्तच डोक्यात भिनते. परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नसते कि ते ज्या गोष्टीसाठी पेटून संघर्ष करत आहेत ते फक्त एक मृगजळ आहे आणि त्यातून समाजाच कल्याण होण कधीही शक्य नाही.
मान्य आहे कि एकाधिकारशाही मध्ये निर्णयप्रक्रिया लवकर होते परंतु एकट्या व्यक्तीने घेतलेला निर्णय सर्व शक्यता पडताळूनच घेतला जाईल याची शाश्वती नसते. याउलट लोकशाही मध्ये चर्चा करून निर्णय घेतले जात असल्यामुळे चुकीचे निर्णय सहसा घेतले जात नाहीत, भलेही दोन निर्णय कमी घेतले जातात.
एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि “जनतेला पिळवटून केलेला विकास वांझोटा असतो.”
जरी मार्क्स्वदाच्या काही गोष्टी आकर्षक वाटण्या सारख्या असल्या तरी व्यावहारिक जीवनात त्या सफल होऊ शकणार नाहीत. प्रत्यक्षात ज्या देशांमध्ये साम्यवाद लागू झाला त्या देशात कालांतराने फासीवाद आला, जनतेच्या हक्कांची पायमल्ली झाली, कार्यक्षमता खुंटली, स्वातंत्र्यावर गदा आली. व ज्या क्रांतीच्या मार्गाने, समृद्धीच्या अपेक्षेने साम्यवादी गर्तेत उडी घेतली होती तीतून निघणे अशक्य होऊन बसले.
जुलमी भांडवलशाही उलथून टाकून, गरिबांना सोशिताना कष्टकार्याना अच्छे दिन च आमिष दाखून साम्यवाद सत्तेवर येतो आणि मग बेलगाम घोड्यासारखा चौखूर उधळू लागतो. त्यावर कोणाचाही अंकुश राहत नाही.
प्रत्येक राजव्यवस्थेला नियंत्रित करण्याचा काही मार्ग असायला हवा आणि तो जनतेच्या हातात असायला हवा न कि मुठभर मक्तेदारांच्या. परंतु या लगामाच्या अभावाने कष्टकरी जनतेला समृद्धीच  आमिष दाखून सत्तारूढ झालेला साम्यवाद जनतेला छळणाऱ्या फासिवादा मध्ये परावर्तीत होतो.
मार्क्स च्या मते ”समाजवाद हा साम्यवादाकडे जाण्याचा मार्ग आहे.” मार्क्स ने सन १८४८ मध्ये साम्यवादाची विस्तृत रूपरेषा मांडली आणि १८८३ मध्ये त्याचे निधन झाले. आणि मार्क्स च्या निधानंतर तब्बल ३० वर्षांनी रशिया मध्ये क्रांती होऊन त्याने सांगितलेल्या तत्वांचे सरकार आले व सुदैवाने ते पाहण्यासाठी तो हयात नवता. नाहीतर त्याने सांगितलेल्या मार्गावरून गेलेल्या भोळ्या भाबड्या शोषित वर्गाचे झालेले हाल मार्क्स पाहू शकला नसता.
तसे पाहायला गेल तर मार्क्स ने ब्रिटन ची अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेऊन साम्यवादाची रचना केली होती पण तो ब्रिटन मध्ये न लागू होत रशियात लागू झाला. त्यातही मार्क्स नि सांगितलेल्या मार्गाने रशियात व्यवस्था परिवर्तन झाले नाही. कारण त्याच्या मते सरंजामशाही जाऊन समाजवाद यायला हवा आणि त्यानंतर साम्यवाद. समाजवादा मार्गे साम्यवाद हा मार्क्स चा मुल सिद्धांत होता पण रशिया मध्ये समाजवाद प्रस्थापित न होता थेट साम्यवाद आला. त्याच बरोबर रशियात लागू झालेला साम्यवाद मार्क्स च्या सिद्धांताला छेद देणारा लेनिन चा साम्यवाद होता. त्यानंतरही जोसेफ स्टालिन, माओ झेडोंग इत्यादींनी आपापल्या परीने त्यात बदल केले.
रशियात साम्यवाद का आला?
कोणत्याही देशात नवीन राज्यव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था आणण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था डळमळीत झालेली हवी व त्या व्यवस्थे बद्दल जनतेच्या मनात असंतोष असायला हवा तेवाच व्यवस्था परिवर्तन होते. याच प्रमाणे रशिया मधील प्रस्थापित झार शाही ला लोक कंटाळले होते आणि त्याला उपलब्ध असलेला एकमेव पर्याय म्हणजे साम्यवाद होता तो रशियाने स्वीकारला.
साम्यवादाची शोकांतिका म्हणजे ज्या कोणत्या देशात साम्यवाद प्रस्थापित झाला त्या देशात कालांतराने फासीवाद आला आणि त्या देशाच्या नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य अमानुषपणे चिरडल गेलं. रशिया असेल कोरिया असेल किंवा सध्याची क्युबा मधली घराणेशाही असेल हि याची आजच्या जगातील ताजी उदाहरणे समोर आहेत.

म्हणून मार्क्स ने फक्त साम्यवाद लिहून अर्धवट ठेवलेलं वाक्य मी साम्यवाद पाहून पूर्ण करतो, “समाजवाद हा साम्यवादा कडे जाणारा मार्ग आहे आणि साम्यवाद हा फासिवादाकडे नेणारा महामार्ग आहे.”
सदर लेख साप्ताहिक चपराक मासिकात प्रसिद्ध झाला आहे.