Thursday 15 June 2017

कार्ल मार्क्स समजून घेताना...

कार्ल मार्क्स 
    आजवर या जगावर अनेक विचारवंत, कलाकार, राज्यकर्ते, लेखक इत्यादींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, चांगला किंवा वाईट प्रभाव टाकला त्यातूनच आजचा समाज घडला. आपल्या समाजाच्या सद्य स्थितीस कारणीभूत असलेले कित्येक विचारवंत आपल्याच नव्हे तर इतिहासाच्या देखील विस्मृतीत गेले आहेत. काही व्यक्ती असतात ज्या या कालपटलावर आपल्या विचारांनी स्वतःच एक अढळ स्थान निर्माण करतात त्यातलाच एक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स.


आजच्या जगावर न भूतो असा प्रभाव टाकणाऱ्या मार्क्स ला तटस्थपणे समजून घेण खूप आवश्यक आहे. आजचे तथाकथित लेखक विचारवंत एक तर मार्क्स च्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत किंवा त्याच्या द्वेषात अंध तरी आहेत. त्यामुळे आजच्या जगात कालबाह्य ठरलेल्या उजव्या डाव्या विचारसरणीच्या परीघाबाहेरून त्याचा उहापोह करणे अत्यावश्यक आहे.
मार्क्स ला समजून घेण्यासाठी त्याच्या विचारांचा कालसापेक्ष विचार केला गेला पाहिजे. ज्या काळात त्याने त्याचे विचार मांडले त्या काळातील सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक परिस्थितींचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. 
मार्क्स चा सुरुवातीचा काळ
    कोणाही व्यक्तीची वैचारिक जडणघडण समजून घेताना त्याचा जीवनप्रवास, त्याच्यावर असलेला विविध विचारवंतांचा प्रभाव, सदरहू व्यक्तीचे असलेले समाजाबाबत चे आकलन इत्यादी अनेक गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
कार्ल मार्क्स चा जन्म ५ मे १८१८ रोजी जर्मनी मधील एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. मार्क्स चं जवळपास सर्वच शिक्षण जर्मनी मधेच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच त्याने फ्रेंच राज्यक्रांती, बेल्जिअन राज्यक्रांती, पोलंड चा उठाव इत्यादींचा सखोल अभ्यास केला. पदवीनंतर त्याने वडिलांच्याच पाऊलावर पाउल ठेवत कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ‘बॉन विद्यापीठात’ प्रवेश घेतला तेथेच त्याची त्याच्या भावी बायकोशी ‘जेनी वोन वेस्टफालन’ हिच्याशी ओळख झाली. पुढे बर्लिन विद्यापीठातून त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात तो हेगेल च्या विचारप्रवाहात सामील झाला. हेगेल च्या विचारांचा त्याने अत्यंत बारकाईने अभ्यास केला. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.
फ्रेडरिक एंगल्स 
पुढे मार्क्स ने लोकशाही, समाजवादी, भांडवलशाही, निसर्ग, इतिहास, आर्थिक व सामाजिक तत्वाज्ञांनाच सखोल अभ्यास केला. त्याच्या संशोधनाबद्दल जेना विद्यापीठाने त्याला पहिली डॉक्टरेट प्रदान केली. याच काळात तो एका स्थानिक वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून काम पाहत होता. या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सामन्यांचे, कष्टकरी समाजाचे प्रश्न तो हिरीरीने सर्वांसमोर मांडून अल्पावधीतच नावारूपाला आला. सुरुवातीच्या काळात लोकशाही मार्गाने क्रांतीची भाषा करणारे त्याचे अग्रलेख हळूहळू विखारी रूप घेऊ लागले आहेत हे ध्यानात येताच तत्कालीन सरकारने त्याच्या वृत्तपत्रावर बंदी आणली. त्याच्या सर्व लेखांवर, भाषणांवर सरकारी अधिकारी  कडक लक्ष ठेऊन असल्यामुळे त्याला जर्मनीत राहून चळवळ उभी करण अशक्य झालं होतं. जून १८४३ मध्ये मार्क्स ने जेनी सोबत विवाह करून जर्मनीला राम राम केला व फ्रांस ची राजधानी असलेल्या परीस मध्ये स्थाईक झाला. तेथेच एका नियतकालिका साठी काम करू लागला.
संपादक म्हणून काम पाहत असताना मार्क्सची ओळख ‘फ्रेडरिक एंगल्स’ याच्याशी झाली जो आयुष्यभरासाठी त्याचा वैचारिक सहकारी बनून राहिला. त्यानंतर प्यारिस मध्ये मार्क्स आणि एंगल्स च्या वारंवार भेटी आणि चर्चा घडू लागल्या. कामगारांच्या भावना भडकविण्याच्या आरोपाखाली जर्मन सरकारच्या दबावामुळे मार्क्स ची परीस मधून हकालपट्टी केली. नंतर तो परिवारासोबत आणि एंगल्स सोबत ब्रुसेल्स इथं स्थाईक झाला. तिथूनच त्यांनी मिळून इंग्लंड च्या अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. सन १८४६ साली ब्रुसेल्स मधेच त्यांनी पहिल्या साम्यवादी समितीची स्थापना केली. त्यानंतर त्यांना इंग्लंड वरून कामगार हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने मार्क्स आणि एंगल्स ला इंग्लड ला येण्याचे आमंत्रण दिले जे त्यांनी स्वीकारलं, पुढे त्यांनी त्या संघटनेचं नाव बदलून कम्युनिस्ट लीग असं ठेवण्यात आल.
कम्युनिस्ट मनीफिस्टो
दरम्यानच्या काळात युरोप मध्ये उदारमतवादी लोकांच्या वर्तुळात मार्क्स च्या काम्युनिजम बद्दल बरीच उत्सुकता वाढली होती म्हणून त्याने सन १८४८ मध्ये एंगल्स च्या बरोबरीने कम्युनिस्ट मनीफिस्टो प्रकाशित केला. ज्यात साम्यवादाच्या मूळ विचारसरणीची तत्वे विषद केली आहेत.
जुलमी भांडवलशाही ने ग्रासलेल्या युरोप च्या कामगारांना मार्क्सच्या विचारांमध्ये एक आशेचा किरण दिसू लागला. मार्क्स ला युरोप च्या कानाकोपर्यातून व्याख्यानासाठी बोलावलं जाऊ लागल. अनेक कारखान्यांमध्ये कामगार संघटना सक्रीय होऊ लागल्या. कामगार हक्कांसाठी आंदोलने करू  लागले काही ठिकाणी सशस्त्र आंदोलने देखील झाले. दरम्यानच्या काळात त्याला त्याच्या लिखाणामुळे बऱ्याच कोर्टाच्या वाऱ्या घडल्या होत्या. मार्क्स ने विज्ञान, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास इत्यादी शाखांचा सखोल अभ्यास केला होता. १४ मार्च १८८३ रोजी त्याच निधन झालं.
हा झाला मार्क्स चा एकंदर जीवनप्रवास आता मार्क्स कालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती काय होती याचा अभ्यास केल्यानंतर मार्क्स ची भूमिका समजून घेता येईन.
   त्याकाळात राजसत्ता, अर्थसत्ता आणि न्यायसत्ता ही मुठभर लोकांच्या हाती एकवटलेली होती. सामान्य जनता या सगळ्या कुचकामी मस्तवाल समाजव्यवस्थेत भरडून निघत होती. श्रीमंतांसाठी वेगळे कायदे असत. कामाचा योग्य मोबदला देखील मिळत नसे. त्याचबरोबर राजसत्ता सतत होणार्या परकीय आक्रमणामुळे अस्थिर देखील असत, त्यामुळे समाजाचे अनन्वित हाल होत असत. नंतरच्या काळात इंग्लड मध्ये औद्योगिक क्रांतीची बीज रोवली गेली.माणसाच काम हलकं करणारी यंत्र आली, कामाचा वेग वाढून देशाची उत्पादकता वाढीस लागेल अशे अंदाज बांधले जाऊ लागले. पण औद्योगिक क्रांती ही देखील सामान्य माणसाला मृगजळ बनून राहणार होती हे एक विदारक सत्य होते, कारण आधीच धनदांडगे असलेल्या सामंतादी लोकांकडेच कारखानदारी आली पर्यायाने पैसा त्यांच्याकडेच एकवटला.
मार्क्स च्या जन्मा अगोदरच इंग्लड मध्ये सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीचं लोण युरोपभर पसरलं होतं. मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाला मागणी होती तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न आजच्या प्रमाणे तेव्हाही बेभरवशी होतं, त्याचबरोबर आजच्या पेक्षा अधिक कष्टप्रद देखील होतं. नवीन पिढीला शेतीत रस नव्हता, शाश्वत आणि नियमित अर्थार्जनाच्या अपेक्षेने आणि शहराच्या जीवनशैलीला भुलून अनेक युवक शहरात स्थलांतरित झाले. शहरात कारखान्यात कामगारांची आवश्यकता तर होतीच. अशा अनेक कारणांनी झपाट्याने शहरीकरण झाले. कामगारांची संख्या वाढू लागली. कारखान्यांच उत्पन्न झपाट्याने वाढल. खेड्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात शहरी भागात स्थलांतर केल्यामुळे, रोजगाराचा तुटवडा जाणवू लागला. गरजे पेक्षा अधिक मजूर उपलब्ध झाल्यामुळे तत्कालीन कारखानदारांची मुजोरी वाढली. कामगारांचे वेतन मनमानी ने ठरविण्यात येत असे. दिलेल्या तुटपुंज्या वेतनात कामगारांकडून अतिरिक्त काम करून घेण्यात येई. अतिशय तुटपुंज्या अर्थार्जानामुळे कामगारांची परिस्थिती अतिशयच हलाखीची झाली होती. कसल्याही निचऱ्याची व्ययस्था नसलेल्या वस्त्यात राहून कामगारांचे व त्यांच्या परिवाराच्या आरोग्यचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याच बरोबर त्यांचे मूल देखील शिक्षणापासून वंचित राहत व पुढे चालून त्याच कारखान्यात त्यांना काम करावे लागत असे.
अशा अनेक समस्यांना कामगारवर्गाला सामोर जाव लागत असे. कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यात त्यांना सोडविण्यात कोणाचेही स्वारस्य नव्हते ते असण्याचे काही कारण देखील नव्हते. कामगार हे फक्त काम करण्यासाठीच असतात अशीच तत्कालीन समाजाची धारणा होती. त्यातूनच त्यांच्या मनात असंतोषाची बीजं पेरली गेली. या असंतोषाला कोणतेही वैचारिक, आर्थिक, नैतिक, सामाजिक पाठबळ नव्हते म्हणून या संघर्षाची ठिणगी पडण्यासाठी शतकाहून अधिक काळ जावा लागला. कालांतराने कामगारांच्या मनात संघर्षाची क्रांतीची भावना कुठे तरी पेट घेत होती.
भांडवल 
याच काळात मार्क्स इतिहास, लोकशाही आणि समाजशास्त्राचा अभ्यास करत होता. समाजाचा अभ्यास करताना त्याने कामगार मध्यमवर्ग आणि भांडवलदार यांचा सखोल अभ्यास केला. कारखानदारांच अर्थशास्त्र अभ्यासल्यावर कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक त्याच्या ध्यानात आली. त्याने त्यावर ‘दास क्यापिटल’ (भांडावंल) या त्याच्या बहुचर्चित ग्रंथात सविस्तर मांडणी केली. त्याने सुरुवातीला कामगारांच्या हक्कांसाठी समाजवादाचा पुरस्कार केला.तत्कालीन समाजवादी नेत्यांच्या कचखाऊपणा मुळे अथवा भांडवलशाही धार्जिणेपणा मुळे समाजवादाचा उदोउदो करूनदेखील काही हाती लागत नव्हत हे मार्क्स च्या ध्यानात आलं.
कामगारांच्या भल्यासाठी काहीतरी कठोर पाउल उचलावं लागणार याची मार्क्सला जाणीव झाली. त्याने त्याच्या वैचारिक सहकारी फ्रेडरिक एंगल्स बरोबर साम्यवादाचा प्रबंध लिहिला. जो वर्गसंघर्षावर आधारित होता. मार्क्सच्या भांडवलशाही विरोधी विचारांमुळे त्याला तत्कालीन फ्रांस, जर्मन, बेल्जिअन, इत्यादी देशांच्या सरकारांनी त्याला निष्काशित केल होतं आणि मृत्युसमयी मार्क्स कडे कोणत्याही देशाचे नागरिकत्व नव्हते.

कामगारांना अपेक्षित असलेली किंवा शक्य असलेली क्रांती फक्त बंदुकीच्या गोळीतूनच मिळू शकणार होती. त्याचं महत्वाच कारण म्हणजे तत्कालीन कारखानदारांकडे वर्षानुवर्षे चालत आलेली राजेशाही, सामंतशाही त्यातून उत्पन्न झालेला माज. स्वतः उच्च असण्याचा अहंगंड व सगळे जगच आपल्याला काहीतरी देण लागत अशी निर्माण झालेली भावना. अशा लोकांकडून सनदशीर मार्गाने आपली कधीच नसलेली गोष्ट नैतिकतेच्या आधारावर मागून घेणे अशक्य होतं. त्यासाठी एक क्रांतिकारी लढा उभारणे आवश्यक होते.

सुरुवातीच्या काळात मार्क्स ने दोन्ही वर्गांचा त्यांच्या आर्थिक आणि मानसिक अवस्थांचा अभ्यास केल्यानंतर त्याला समानता आणण्यासाठी वर्गसंघार्षा खेरीज पर्याय दिसत नव्हता. त्याने कामगारांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक वैचारिक अधिष्टान बनवलं. दरम्यानच्या काळात विविध वर्तमानपत्रातून, नियतकालिकांमधून, विविध व्याख्यानांमधून आपले विचार जगासमोर सातत्याने मांडत होता. मार्क्स च्या विचारांनी प्रेरित होऊन ठिकठिकाणी कामगार संघटना अस्तित्वात येऊ लागल्या. न्याय्य मागण्या ते मालकांच्या पुढे मांडू लागले. हीच मार्क्स च्या कामाची आद्य फलश्रुती म्हणता येईल.
मार्क्सचे लेख वाचताना एक गोष्ट सातत्याने लक्षात येते ती म्हणजे मार्क्स ला समता अपेक्षित आहे. परंतु त्याकाळात (जेव्हा आपण औद्योगिक क्रांतीच्या नंतरचा काळ विचारात घेतो) त्याला अपेक्षित असलेली समता शांततापूर्ण मार्गाने आणणे शक्य नव्हते म्हणून त्याने हिंसेचे समर्थन केले. मार्क्स हयात असताना इंग्लंड फ्रांस मध्ये काही ठिकाणी शांततापूर्ण व काही ठिकाणी हिंसक कामगार आंदोलने झाली परंतु मार्क्स च्या हयातीत त्याच्या स्वप्नातील संघटीत कामगारक्रांतीचा लढा उभारण मार्क्स ला शक्य झालं नाही.
 डावीकडून लेनिन, स्टालिन, माओ,  
संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली अशी पहिली संघटीत कामगार चळवळ रशिया मध्ये उभी राहिली. रशियन राज्यक्रांती जी १९१७ सालात घडली म्हणजे मार्क्स च्या मृत्युपश्चात जवळ पास ३०-३२ वर्षांनी. मार्क्स ने इंग्लड मध्ये साम्यवादी क्रांती घडवून आणण्याचे प्रयत्न केले असून देखील कामगारक्रांतीचा वनवा रशिया मधेच का पेटला याचा विचार करणे आवश्यक आहे. रशियात साम्यवादी क्रांती झाली पण ती मार्क्सच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन झालेली लेनिनवादी क्रांती होती जी पुढे ट्रोटस्की च्या निष्कासना नंतर स्टालिन प्रणीत हुकुमशाही मध्ये परावर्तीत झाली. आणि पुढे साम्यवादी रशियाचा जो काही प्रवास आहे तो सर्वश्रुत आहे.  
कामगार हक्कांच्या वल्गना करत, कामगारांना अच्छे दिन चे आमिष दाखवून, क्रांतीच्या खडतर मार्गाने सत्तेवर आलेल्या साम्यवादाने जगाला किंवा रशियाला काय दिले याच्यापेक्षा कामगारांना काय दिले याचा विचार करणे आवश्यक आहे. क्रांतीनंतर कामगारांना औटघटकेच सुख नक्कीच मिळालं पण परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ म्हणण्यापेक्षा ‘आगीतून फुफाट्यात’ आल्यासारखी झाली.
रशियन राज्यक्रांती 
कामगारांना समोर ठेऊन आपली उभं आयुष्य त्यांच्या कल्याणाचा विचार करण्यात घालविणारा मार्क्स सुदैवाने तेव्हा हयात नव्हता. अन्यथा मार्क्स त्याच्या विचारांची होळी आणि कामगारांचे हाल कदाचित पाहू शकला नसता. परंतु कामगारांच्या या संघटीत लढ्याने कामगारही देशाचा अविभाज्य आणि महत्वाचा घटक व प्रसंगी तो देखील सत्तापालट घडविण्यास कारणीभूत ठरू शकतो हे जगाला दाखवून दिलं. त्यानंतर च्या जागतिकीकरणाच्या काळात कामगार कायदे अस्तित्वात आले, लोकशाहीने त्यांना समान अधिकार दिले. आजच्या कामगाराला समाजात बरोबरीच स्थान मिळाले आहे म्हणून आता मार्क्स प्रणीत साम्यवाद व त्यातला वर्गसंघर्ष कालबाह्य झाला आहे. 

फक्त रशिया मधलीच नाही तर इतर ठिकाणच्या साम्यवादी क्रांतीची देखील अशीच दुरवस्था होत गेली. म्हणजे मार्क्स चा कागदावर आदर्शवादी वाटणारा विचार जिथं कुठ व्यावहारिक जीवनात अमलात आणला त्या ठिकाणची परिस्थिती आणखीनच खराब होत गेली असा इतिहास आहे. पुढे चीन मध्ये माओ ने तर त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल व त्याच्याच विचारातून सुजलाम सुफलाम भारताच्या जंगलामध्ये नक्षलवाद नावाच्या लालराक्षसाने जन्म घेतला. जो आजवर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सलणारी भळभळती जखम बनून आहे. 
मार्क्स चे विचार व्यावहारिक जीवनात का टिकून राहू शकले नाहीत याचं अनेक महत्वाच्या कारणापैकी एक म्हणजे “हातात सत्ता असल्या नंतरच्या मानवी वृत्तीचे आकलन करण्यात मार्क्स सपशेल अपयशी ठरला व सत्ता पालटाचे कोणतेही सूत्र मांडणे त्याला महत्वाचे वाटले नाही.
एकंदर काय तर मार्क्स चे विचार कागदावर कितीही क्रांतिकारी भासले तरी ते व्यावहारिक जीवनात काळाच्या कसोटीवर व मानवी प्रवृत्तीपुढे टिकू शकले नाहीत हे उघड सत्य आहे.
मार्क्स आणि एकविसावे शतक
मार्क्स चा एकंदर विचारच वर्गसंघर्षावर आधारित आहे. मार्क्सच्या स्वप्नातील साम्यवाद येण्यासाठी समाजात असंतोष असणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचबरोबर प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी असायला हवी अन्यथा साम्यवादी क्रांती करणे अशक्य आहे. ज्या कामगारांचा मसीहा बनून मार्क्स आला होता ते कामगार आज संविधानाने दिलेल्या लोकशाही मध्ये कामगार कायद्यांच्या संरक्षणा खाली सुखी आहेत त्यांना कोणत्याही मृगजळाची आता गरज उरलेली नाही. मार्क्सवाद आज केवळ कागदावर शिल्लक आहे, आहे म्हणायला ५ देशांमध्ये साम्यवाद मोडक्या तोडक्या अवस्थेत तग धरून आहे.
एक गोष्ट आपण नेहमी ध्यानात ठेवायला हवी कि “लोकशाही ला केवळ लोकशाहीच पर्याय ठरू शकते आणि लोकशाहीतच मानवाच्या स्वातंत्र्याची शाश्वती आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ इत्यादी ठिकाणी मावोवाद्यांनी देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असूनही आज ते देशभर मोकळे फिरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच एवढ मोठं उदाहरण केवळ लोकशाही मधेच असू शकत. साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणारया गळचेपी वर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.
आज भारतातील कम्युनिस्ट देखील त्याचं कम्युनिस्ट पण विसरून लोकशाही च्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत यावरून आपल्याला आपण अनुभवत असलेल्या लोकशाहीतील व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना येईन. 


(सदर लेख साप्ताहिक चपराक च्या जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला आहे)

Friday 2 June 2017

लंडन,पॅरिस,मँचेस्टर - इस्लामिक आतंकवादाचे युरोपात थैमान

ली रिगबे 
   दिनांक २२ मे २०१३ रोजी लंडनच्या रस्त्यावर 'ली रिगबे' या निःशस्त्र ब्रिटिश सैनिकाची भर दिवसा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली गेली. ‘मायकेल अडिबोलाजो’ आणि ‘मायकेल अडेबोवले’ अशी हल्लेखोरांची नावे होती. दोघेही जन्माने ख्रिस्ती आणि पुढे इस्लाम स्वीकारलेले, ब्रिटीश-नायजेरिअन वंशाचे ब्रिटनचे नागरिक होते. काही दिवसापूर्वी एका ‘सर्च ऑपरेशन’ मध्ये ब्रिटीश सैनिकांनी काही आतंकवाद्याना कंठस्नान घातलं होतं, त्याचा हिशेब चुकता करण्यासाठीच ‘ली रीग्बे’ ची हत्या करण्यात आली होती. आणखीन हल्ल्यांच्या भीतीने सैनिकांनी गणवेशात बाहेर पडू नये असा आदेश देखील ब्रिटीश सरकारने जारी केला होता. पुढे या दोघांना ब्रिटीश न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  लंडन सारख्या अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात, दिवसाढवळ्या एका सैनिकाची निर्घृणपणे हत्या केली जाते, हल्लेखोर फरार न होता “इस्लाम च्या वाट्याला जाल तर सर्वांची हीच अवस्था करू असं “ त्याच ठिकाणी ओरडून धमकावत होते. यापासून ब्रिटीश सरकारने, तिथल्या नागरिकांनी काय धडा घेतला? या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या? हे समजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि सरकार मध्ये बसलेले बुद्धीजीवी यांच्या प्रतिक्रिया यांचा वेगवेगळा विचार केला पाहिजे.

 इस्लामिक आतंकवाद्यांच्या या कृत्याने संतापून संपूर्ण ब्रिटन मध्ये इस्लाम विरोधी वातावरण तयार झालं ज्यातून संपूर्ण ब्रिटन मध्ये ठीकठीकानी मुसलमानांवर आणि जवळपास ११ मशिदींवर हल्ले झाले. ‘टेल मामा’ संस्थेच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यांची संख्या दोनशेच्या पुढे होती. या हल्यानंतर भारतातल्या प्रमाणेच सर्व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला आणि बुद्धीजीवी वर्गाने इस्लाम चा आणि या हल्ल्याचा संबध जोडू नये असाच राग आळवला.

मेहदी हसन 'ऑक्सफोर्ड युनियन' मध्ये इस्लामची बाजू मांडताना 
  हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जगातील बुद्धीजीवी लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड युनिअन मध्ये “इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे” या विषयवार वादविवादाचे आयोजन करण्यात आले. त्या वादविवादात ब्रिटनचे सुप्रसिद्ध पत्रकार मेहदी हसन, ऑक्सफर्ड मध्ये इतिहासाचं शिक्षण घेणारा मथ्यू हन्डले, दीन इन्स्टीट्युट चे संस्थापक आणि इस्लाम चे गाढे अभ्यासक अडम दीन यांनी इस्लाम ची बाजू मांडली. तर प्रस्तावाच्या विरोधात ‘राष्ट्रीय धर्मनिरपेक्ष सोसायटी’च्या सदस्य एनी मेरी वॉटर्स, ‘स्टॅन्डपॉईंट’ नियतकालिकाचे संपादक, पत्रकार डॅनिअल जोन्स आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक पीटर अटकिन्स यांनी बाजू मांडली. सदर चर्चेत सर्वच वक्त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्यातही मेहदी हसन आणि डॅनिअल जोन्स यांची मांडणी उल्लेखनीय ठरली. २८६ विरुद्ध १६८ इतक्या मतांच्या फरकाने ‘’इस्लाम हा शांततेचा धर्म आहे’’ हे ऑक्सफर्ड च्या चर्चेत सिद्ध झालं. ही चर्चा युट्युबवर सहजरीत्या उपलब्ध आहे म्हणून चर्चेतील मुद्दे इथं मांडत नाही. ही चर्चा एकप्रकारे ब्रिटीश नागरिकांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी ठरली अस म्हटल तर वावग ठरणार नाही.             

‘ऑक्सफर्ड युनियन’ च्या चर्चेचा निकाल सुखवस्तू किंवा बुद्धीजीवी वर्गाच्या प्रतिक्रियेच प्रतिनिधित्व करतो असं ढोबळमानाने गृहीत धरता येऊ शकत. ज्यांना शक्यतो या दहशतवादाची झळ बसत नाही. तर दुसऱ्या बाजूस सामान्य जनतेमध्ये हल्ल्यानंतर इस्लाम विरुद्ध उसलेला प्रचंड क्षोभ या दोन गोष्टींमध्ये प्रचंड तफावत आहे. इस्लामिक कट्टरता वादाने मध्य-आशियाचा नरक केल्यानंतर, तिथल्या पिडीत मुसलमानांचे लोंढे युरोपच्या दिशेने आले, तेव्हा तिथल्या स्थानिक संघटनांनी याचा प्रचंड विरोध केला, परंतु बुद्धीजीवी लोकांच्या दबावापुढे आणि मानवता या गोंडस नावाच्या आड या निर्वासितांना युरोपने आश्रय दिला. लंडन, पॅरिस, म्यान्चेस्टर इत्यादी ठिकाणी झालेले दहशतवादी हल्ले ही इस्लामिक कट्टरतेने युरोप च्या मानवतावादाला मारलेली सणसणीत चपराक म्हणता येऊ शकेल.

  लंडन मधील ‘ली रीग्बे’ च्या हत्येच्या साधारण दोन वर्षानंतर, दिनांक १९ फेब्रुवारी २०१५ रोजी अवघे १९ वर्षे वय असणाऱ्या ‘बृश्तोम झीअमनी’ या तरुणाला अशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असताना अटक केली. पहिल्या घटनेतील गुन्हेगार ‘मायकेल आडीबोलाजो’ त्याचा आदर्श आहे अस त्यानं त्याच्या कबुली जबाबात मान्य केलं. याच शृंखलेत २९ एप्रिल २०१५ रोजी ‘इस्लाम काझी’ या केवळ १८ वर्षे वयाच्या तरुणाला, त्याच्याच एका मित्राला दोन ब्रिटीश सैनिकांची हत्या करण्यास प्रवृत्त केल्या बद्दल आणि बॉम्ब बनविण्यासाठी वस्तू जमवल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटनेने फक्त मुस्लिमच नव्हे तर गव्हाळ वर्णीय आशियाई लोकांबद्दल देखिल द्वेष वाढीस लागला, ज्यातूनच १४ जानेवारी २०१५ रोजी एका ब्रिटीश नागरिकाने भर दिवसा दुकानात एका शीख डॉक्टर ची हातोडा आणि कोयत्याने वार करून हत्या केली.
मँचेस्टर येथील बॉम्ब हल्ला 
ब्रिटीश सरकार मध्ये असलेला बुद्धीजीवी वर्ग जनभावना ओळखण्यासाठी सपशेल अपयशी ठरला आहे हे त्यांच्या आणि सामन्यांच्या प्रतिक्रियातली तफावत पाहून आपल्या लक्षात येतं. त्यांची आणि सामान्य नागरिकांची नाळ पूर्णतः तुटलेली आहे.

  आज (२२ मे २०१७) मँचेस्टर मध्ये बॉम्ब हल्ला झाला ज्यात, तब्बल बावीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे आणि कित्येक नागरिक जखमी झाले आहेत. वेस्टमिनिस्टर (२२ मार्च २०१७) च्या कार हल्ल्यानंतरचा या चालू वर्षातील हा दुसरा हल्ला आहे. लंडन मधल्या जुलै २००५ च्या आत्मघातकी स्फोटानंतरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून या हल्ल्याकड पाहिलं जात आहे, लंडन स्फोटात जवळपास ५५ नागरिक मृत्युमुखी पडले होते.

   या सर्व हल्ल्यात एक साम्य आहे ते म्हणजे सर्व हल्ले इस्लामिक आतंकवाद्यानीच घडवून आणले आहेत. युरोप ने मानवतेच्या नावाखाली ज्या इराक सीरियाच्या निर्वासितांना आश्रय दिला त्याचेच हे परिणाम आहेत. पॅरिस हल्ल्यातील सूत्रधार देखील निर्वासित मुसलमानच होते हे देखील लक्षात घेतलं पाहिजे.
‘ओनस’ च्या सर्वे अनुसार मागील एका वर्षात इंग्लंड आणि वेल्स मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यात जवळपास २७ टक्के इतकी वाढ झालेली आहे (टेलिग्राफ ने दिलेलं वृत्त). या वाढणाऱ्या गुन्हेगारीमागे बेरोजगार निर्वासितांचा देखील अमूल्य वाटा आहे.

  भारतात ज्याप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत आहे त्याच प्रमाणे युरोप मध्ये सिरीअन निर्वासितांचा प्रश्न. दोन्ही ठिकाणी सरकारच्या चुकीच्या किंवा कुचकामी धोरणांमुळे सामान्य जनता भरडून निघत आहे. पश्चिम बंगाल मध्ये मागच्या एक वर्षांत २ पोलीस स्टेशन ला आग लावण्यापर्यंत या घुसखोरांची मजल गेली आहे यावरून आपल्याला ही घुसखोरीची समस्या किती गंभीर बनत आहे याचा अंदाज येऊ शकेल. 
‘ली रीग्बे’ च्या हत्येनंतर जी चर्चा ऑक्सफर्ड युनिअन मध्ये घेतली होती तीच जर आजच्या ‘मँचेस्टर’ हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये घडवून आणली तर त्याचे निकाल नक्कीच वेगळे असतील. आजवर जो आतंकवाद प्रामुख्याने आशिया पुरता मर्यादित होता तो आज ‘सेफ हेवन’ समजल्या जाणार्या युरोपात धुमाकूळ घालत आहे. त्यावर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत तर परिस्थिती आणखीन हाताबाहेर गेल्या शिवाय राहणार नाही.



अक्षय बिक्कड 

सदर लेख साप्ताहिकच चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे.