Friday 2 June 2017

लंडन,पॅरिस,मँचेस्टर - इस्लामिक आतंकवादाचे युरोपात थैमान

ली रिगबे 
   दिनांक २२ मे २०१३ रोजी लंडनच्या रस्त्यावर 'ली रिगबे' या निःशस्त्र ब्रिटिश सैनिकाची भर दिवसा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली गेली. ‘मायकेल अडिबोलाजो’ आणि ‘मायकेल अडेबोवले’ अशी हल्लेखोरांची नावे होती. दोघेही जन्माने ख्रिस्ती आणि पुढे इस्लाम स्वीकारलेले, ब्रिटीश-नायजेरिअन वंशाचे ब्रिटनचे नागरिक होते. काही दिवसापूर्वी एका ‘सर्च ऑपरेशन’ मध्ये ब्रिटीश सैनिकांनी काही आतंकवाद्याना कंठस्नान घातलं होतं, त्याचा हिशेब चुकता करण्यासाठीच ‘ली रीग्बे’ ची हत्या करण्यात आली होती. आणखीन हल्ल्यांच्या भीतीने सैनिकांनी गणवेशात बाहेर पडू नये असा आदेश देखील ब्रिटीश सरकारने जारी केला होता. पुढे या दोघांना ब्रिटीश न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  लंडन सारख्या अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात, दिवसाढवळ्या एका सैनिकाची निर्घृणपणे हत्या केली जाते, हल्लेखोर फरार न होता “इस्लाम च्या वाट्याला जाल तर सर्वांची हीच अवस्था करू असं “ त्याच ठिकाणी ओरडून धमकावत होते. यापासून ब्रिटीश सरकारने, तिथल्या नागरिकांनी काय धडा घेतला? या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या? हे समजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि सरकार मध्ये बसलेले बुद्धीजीवी यांच्या प्रतिक्रिया यांचा वेगवेगळा विचार केला पाहिजे.

 इस्लामिक आतंकवाद्यांच्या या कृत्याने संतापून संपूर्ण ब्रिटन मध्ये इस्लाम विरोधी वातावरण तयार झालं ज्यातून संपूर्ण ब्रिटन मध्ये ठीकठीकानी मुसलमानांवर आणि जवळपास ११ मशिदींवर हल्ले झाले. ‘टेल मामा’ संस्थेच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यांची संख्या दोनशेच्या पुढे होती. या हल्यानंतर भारतातल्या प्रमाणेच सर्व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला आणि बुद्धीजीवी वर्गाने इस्लाम चा आणि या हल्ल्याचा संबध जोडू नये असाच राग आळवला.

मेहदी हसन 'ऑक्सफोर्ड युनियन' मध्ये इस्लामची बाजू मांडताना 
  हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जगातील बुद्धीजीवी लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड युनिअन मध्ये “इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे” या विषयवार वादविवादाचे आयोजन करण्यात आले. त्या वादविवादात ब्रिटनचे सुप्रसिद्ध पत्रकार मेहदी हसन, ऑक्सफर्ड मध्ये इतिहासाचं शिक्षण घेणारा मथ्यू हन्डले, दीन इन्स्टीट्युट चे संस्थापक आणि इस्लाम चे गाढे अभ्यासक अडम दीन यांनी इस्लाम ची बाजू मांडली. तर प्रस्तावाच्या विरोधात ‘राष्ट्रीय धर्मनिरपेक्ष सोसायटी’च्या सदस्य एनी मेरी वॉटर्स, ‘स्टॅन्डपॉईंट’ नियतकालिकाचे संपादक, पत्रकार डॅनिअल जोन्स आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक पीटर अटकिन्स यांनी बाजू मांडली. सदर चर्चेत सर्वच वक्त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्यातही मेहदी हसन आणि डॅनिअल जोन्स यांची मांडणी उल्लेखनीय ठरली. २८६ विरुद्ध १६८ इतक्या मतांच्या फरकाने ‘’इस्लाम हा शांततेचा धर्म आहे’’ हे ऑक्सफर्ड च्या चर्चेत सिद्ध झालं. ही चर्चा युट्युबवर सहजरीत्या उपलब्ध आहे म्हणून चर्चेतील मुद्दे इथं मांडत नाही. ही चर्चा एकप्रकारे ब्रिटीश नागरिकांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी ठरली अस म्हटल तर वावग ठरणार नाही.             

‘ऑक्सफर्ड युनियन’ च्या चर्चेचा निकाल सुखवस्तू किंवा बुद्धीजीवी वर्गाच्या प्रतिक्रियेच प्रतिनिधित्व करतो असं ढोबळमानाने गृहीत धरता येऊ शकत. ज्यांना शक्यतो या दहशतवादाची झळ बसत नाही. तर दुसऱ्या बाजूस सामान्य जनतेमध्ये हल्ल्यानंतर इस्लाम विरुद्ध उसलेला प्रचंड क्षोभ या दोन गोष्टींमध्ये प्रचंड तफावत आहे. इस्लामिक कट्टरता वादाने मध्य-आशियाचा नरक केल्यानंतर, तिथल्या पिडीत मुसलमानांचे लोंढे युरोपच्या दिशेने आले, तेव्हा तिथल्या स्थानिक संघटनांनी याचा प्रचंड विरोध केला, परंतु बुद्धीजीवी लोकांच्या दबावापुढे आणि मानवता या गोंडस नावाच्या आड या निर्वासितांना युरोपने आश्रय दिला. लंडन, पॅरिस, म्यान्चेस्टर इत्यादी ठिकाणी झालेले दहशतवादी हल्ले ही इस्लामिक कट्टरतेने युरोप च्या मानवतावादाला मारलेली सणसणीत चपराक म्हणता येऊ शकेल.

  लंडन मधील ‘ली रीग्बे’ च्या हत्येच्या साधारण दोन वर्षानंतर, दिनांक १९ फेब्रुवारी २०१५ रोजी अवघे १९ वर्षे वय असणाऱ्या ‘बृश्तोम झीअमनी’ या तरुणाला अशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असताना अटक केली. पहिल्या घटनेतील गुन्हेगार ‘मायकेल आडीबोलाजो’ त्याचा आदर्श आहे अस त्यानं त्याच्या कबुली जबाबात मान्य केलं. याच शृंखलेत २९ एप्रिल २०१५ रोजी ‘इस्लाम काझी’ या केवळ १८ वर्षे वयाच्या तरुणाला, त्याच्याच एका मित्राला दोन ब्रिटीश सैनिकांची हत्या करण्यास प्रवृत्त केल्या बद्दल आणि बॉम्ब बनविण्यासाठी वस्तू जमवल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटनेने फक्त मुस्लिमच नव्हे तर गव्हाळ वर्णीय आशियाई लोकांबद्दल देखिल द्वेष वाढीस लागला, ज्यातूनच १४ जानेवारी २०१५ रोजी एका ब्रिटीश नागरिकाने भर दिवसा दुकानात एका शीख डॉक्टर ची हातोडा आणि कोयत्याने वार करून हत्या केली.
मँचेस्टर येथील बॉम्ब हल्ला 
ब्रिटीश सरकार मध्ये असलेला बुद्धीजीवी वर्ग जनभावना ओळखण्यासाठी सपशेल अपयशी ठरला आहे हे त्यांच्या आणि सामन्यांच्या प्रतिक्रियातली तफावत पाहून आपल्या लक्षात येतं. त्यांची आणि सामान्य नागरिकांची नाळ पूर्णतः तुटलेली आहे.

  आज (२२ मे २०१७) मँचेस्टर मध्ये बॉम्ब हल्ला झाला ज्यात, तब्बल बावीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे आणि कित्येक नागरिक जखमी झाले आहेत. वेस्टमिनिस्टर (२२ मार्च २०१७) च्या कार हल्ल्यानंतरचा या चालू वर्षातील हा दुसरा हल्ला आहे. लंडन मधल्या जुलै २००५ च्या आत्मघातकी स्फोटानंतरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून या हल्ल्याकड पाहिलं जात आहे, लंडन स्फोटात जवळपास ५५ नागरिक मृत्युमुखी पडले होते.

   या सर्व हल्ल्यात एक साम्य आहे ते म्हणजे सर्व हल्ले इस्लामिक आतंकवाद्यानीच घडवून आणले आहेत. युरोप ने मानवतेच्या नावाखाली ज्या इराक सीरियाच्या निर्वासितांना आश्रय दिला त्याचेच हे परिणाम आहेत. पॅरिस हल्ल्यातील सूत्रधार देखील निर्वासित मुसलमानच होते हे देखील लक्षात घेतलं पाहिजे.
‘ओनस’ च्या सर्वे अनुसार मागील एका वर्षात इंग्लंड आणि वेल्स मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यात जवळपास २७ टक्के इतकी वाढ झालेली आहे (टेलिग्राफ ने दिलेलं वृत्त). या वाढणाऱ्या गुन्हेगारीमागे बेरोजगार निर्वासितांचा देखील अमूल्य वाटा आहे.

  भारतात ज्याप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत आहे त्याच प्रमाणे युरोप मध्ये सिरीअन निर्वासितांचा प्रश्न. दोन्ही ठिकाणी सरकारच्या चुकीच्या किंवा कुचकामी धोरणांमुळे सामान्य जनता भरडून निघत आहे. पश्चिम बंगाल मध्ये मागच्या एक वर्षांत २ पोलीस स्टेशन ला आग लावण्यापर्यंत या घुसखोरांची मजल गेली आहे यावरून आपल्याला ही घुसखोरीची समस्या किती गंभीर बनत आहे याचा अंदाज येऊ शकेल. 
‘ली रीग्बे’ च्या हत्येनंतर जी चर्चा ऑक्सफर्ड युनिअन मध्ये घेतली होती तीच जर आजच्या ‘मँचेस्टर’ हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये घडवून आणली तर त्याचे निकाल नक्कीच वेगळे असतील. आजवर जो आतंकवाद प्रामुख्याने आशिया पुरता मर्यादित होता तो आज ‘सेफ हेवन’ समजल्या जाणार्या युरोपात धुमाकूळ घालत आहे. त्यावर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत तर परिस्थिती आणखीन हाताबाहेर गेल्या शिवाय राहणार नाही.



अक्षय बिक्कड 

सदर लेख साप्ताहिकच चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे.

No comments:

Post a Comment