Saturday 10 March 2018

सोशालीस्ट कम्युनिस्ट मैत्रीचे दुसरे पर्व..


तसं पाहता प्रत्येक व्यक्ती ही जन्मतःच थोडीफार भांडवलवादी मानसिकतेची असते. वैयक्तिक धन संपत्तीचा संचय  करण्याची व त्यात वाढ करण्याची प्रत्येक व्यावहारिक व्यक्तीची इच्छा असतेच. परंतु एकंदर भारतीय समाजाचा एकत्रित अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि आपला समाज थोडासा समाजवादाकडे झुकलेला आहे. समाजवाद हा आपल्या समाजमनात खोलवर रुजलेला आढळतो. परंतु या समाजवादाला कोणतेही ठोकळेबाज स्वरूप नाही.
जगभरात समाजवाद केवळ भांडवलशाहीला प्रतिक्रिया म्हणून उदयास आला म्हणून त्याला जागतिक पातळीवर सर्वमान्य असे स्वरूप नाही. प्रत्येक समाजवादी विचारवंताने आपापल्या परीने समाजवादाची रूपरेषा मांडायचा प्रयत्न केला. आणि ही रूपरेषा प्रत्येकाने आपापल्या सोयीने मांडलेली असल्याने त्याला केवळ ओबडधोबड स्वरूप होतं. परंतु वैचारिक संपदा बाळगून असणारे आणि मोठे मोठे डावपेच आखणारे समाजवादी राजकीय दृष्ट्या म्हणावे तेवढे यशस्वी होऊ शकले नाहीत. समाजवादी चळवळीला जन्मतःच फुटीचा शाप लागलेला आहे म्हणूनच कि काय जितके समाजवादी नेते आहेत तितक्या समाजवादी पार्ट्या आहेत.
गांधीजींनी मांडलेली सर्वोदय ही संकल्पना देखील पूर्णपणे समाजवादी होती तरीदेखील तत्कालीन समाजवादी नेत्यांना गांधीजींचा समाजवाद कधीच रुचला नाही.
भारतीय समाजवादाला एक आकृतीबद्ध रूप देण्यासाठी त्या काळात स्वतःला समाजवादी समजणाऱ्या नेत्यांनी सन १९३४ मध्ये मुंबईत पहिल्या समाजवादी परिषदेचे आयोजन केले. त्यात समाजवादाची साधारण रूपरेषा तयार केली गेली. ज्यात समाजवाद फारच अस्ताव्यस्त रुपात कागदावर उतरवला.  या नेत्यांनी समाजवादी परीषदेच आयोजन केलं, समाजवादाची रूपरेषा मांडली परंतु हे नेते कॉंग्रेस चे सभासद होते. त्यांची वेगळी समाजवादी संघटना अस्तित्वात नव्हती. म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि विचारांप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्न चिन्ह होते. परंतु तीच भारतातल्या समाजवादी चळवळीची नांदी देखील होती.
कॉंग्रेस ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी संघटना होती, परंतु कॉंगेस केवळ श्रीमंत वर्गाचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांची शोषित वर्गाप्रती असलेली कणव केवळ दिखावा आहे अशी तत्कालीन कॉंग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या समाजवादी नेत्यांची भावना होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे प्रथम उद्दिष्ट असल्याने ते कॉंग्रेस बरोबर बस्तान मांडून होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच समाजवादी क्रांती शक्य होणार होती आणि स्वातंत्र्यासाठी एकजूट राहणं त्यांच्यासाठी अपरिहार्य होत.
१९३८ साली लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय परिस्थिती व समाजवादी ऐक्य या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात साम्राज्यवादी देशांविरुद्ध लढणाऱ्या सोविएत रशियाचं गुणगान गायलं गेलं आणि समाजवाद-साम्यवाद यांच्या प्रेमाची पहिली ठिणगी पडली. परंतु साम्यवादाच्या प्रेमात पडण्या आधी समाजवाद्यांनी त्यांचा किंचितही अभ्यास केला नव्हता. कार्ल मार्क्सच्या मते समाजवाद हा साम्यवादाचा प्रतिस्पर्धी आहे किंवा समाजवाद ही साम्यवादाकडे जाणारी पायरी आहे , साम्यवादाच्या प्रसारासाठी समाजवाद खिळखिळा करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी समाजवादी चळवळीत घुसून त्यांचे संघटन खिळखिळे केले पाहिजे असे त्यांचे धोरण होते. याबद्दल पूर्णपणे अज्ञानात असलेल्या समाजवाद्यांनी साम्यवाद्यांना त्यांच्यात सामाऊन घेतलं.
परंतु एका उच्चपदस्थ साम्यवादी नेत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना लिहिलेले एक पत्र समाजवाद्यांच्या हातात पडले, ‘समाजवादी संघटना पोखरून साम्यवादाला बळकटी देण्या विषयीचे’ ते पत्र वाचून समाजवाद्यांचे डोळे उघडले. तोवर संघटनेवर साम्यवाद्यांची पकड चांगलीच मजबूत झाली होती. त्यामुळे समाजवाद्यांचे चांगलेच नुकसान झाले.
समाजवाद्यांचा हा इतिहास सांगण्याचे प्रयोजन म्हणजे समाजवाद्यांनी साम्यवाद्यांशी जवळीक साधण्याची चूक काही दशकांपूर्वी केली होती त्याची आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यावेळी ही अभद्र युती समाजकारणात बस्तान बसवण्यासाठी केली आता सध्या नरेंद्र मोदींच्या वाढता राजकीय प्रभाव व त्यातून आलेलं नैराश्य यातून केलेली आहे. परंतु अपरिहार्यातेमधून झालेली उंदरा मांजराची मैत्री फारकाळ टिकत नसते.
भाजप, संघ यांचा विरोध याशिवाय कोणत्याही विषयावर याचं एकमत नाही. यांच्यामते आज देशापुढे असलेल्या प्रत्येक समस्येच कारण सत्तेत असलेल भाजप सरकार आहे. जी चूक जनसंघाने इंदिरा गांधीचा विरोध करताना केली तीच चूक आज तमाम पुरोगामी मंडळी करताना दिसत आहेत. जर त्यांचे विचार इतकेच प्रामाणिक असते तर आज ते दिवाळखोरीत निघाले नसते. अशी द्वेषापोटी जन्माला आलेली अभद्र मैत्री वांझोटीच राहत असते.
लोकशाहीवर असलेला विश्वास हे समाजवादाचं सौंदर्य होतं तर याच लोकशाहीच्या नरड्यावर पाय देऊन देशावर साम्यवादी तत्वज्ञान लादणं हे साम्यवाद्यांचं स्वप्न कालही होतं आणि आजही आहे. परंतु साम्यवाद्यांना ते शक्य नसल्यामुळे लोकशाही मार्गाने निवडणूक लढणे हा त्यांचा नाईलाज होता. फक्त त्यांनी लोकशाही निवडणुकांमध्ये सहभाग घेतला म्हणजे त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे असा समज करून घेणं मूर्खपणा आहे.
अस्तित्वासाठी ज्या साम्यवाद्यांच्या वळचणीला आज समाजवादी नेते बसले आहेत त्या साम्यवाद्यांची राजकारणातली स्थिती काय आहे याचाही विचार समाजवाद्यांनी केलेला दिसत नाही. आज प्रस्थापित साम्यवादी नेत्यांनी केव्हाच चळवळ सोडून कॉंग्रेसने आंदन दिलेल्या मुठभर विद्यापीठे, संस्था यावर बस्तान बसवले आहे.  त्याच सरकारी ऑफिस मध्ये बसून अधूनमधून थोडफार उपद्रवमूल्य दाखवत असतात. देश सोडून जाऊ, असहिष्णुता आहे, संविधान धोक्यात आहे, लोकशाहीचा गळा घोटला जातोय असली भंपक विधानं त्यांच्या नैराश्याची अपत्ये आहेत. याच्यापलीकडे त्यांची महत्ता अशी काही नाही. थोडक्यात काय तर उघड्या शेजारी नागडं आलं अन रातभर गारठ्यानं  मेलं अशीच यांची गत झाली आहे.
नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही म्हणावा तेवढा उतरलेला नाही, परंतु येत्या काही वर्षांत राजकीय वारे उलटे फिरू लागतील, भाजप सत्तेबाहेर जाईन तेव्हा श्रेयवादासाठी हेच समाजवादी साम्यवादी बंधू एकमेकांच्या सोग्याला हात घालतील अन स्वतःचा खरा मुखवटा देशाला दाखवून देतील. आणीबाणी नंतर इंदिरा गांधीकडून सत्ता काढून घेण्यात विरोधकांना यश मिळालं पण ते पचवता नाही आलं. अशीच काहीशी यांची देखील गत होईल अशी शंका आहे.
म्हणून साम्यवाद्यांच्या सावलीत इमले बंधू पाहणारे समाजवादी जोपर्यंत जनतेत जाऊन मिसळणार नाहीत, त्यांच्या समस्या जाणून घेणार नाहीत, योग्य विषयावर सरकारला कोंडीत पकडणार नाहीत तोवर त्यांची राजकीय शक्ती वाढणार नाही. निव्वळ भाजप संघाच्या नावाने बोंबा मारून हातात फारतर फार जळक खोबरं पडू शकेल सत्ता नाही. 

No comments:

Post a Comment