Thursday 7 June 2018

या कारवाईने नक्षलवाद संपणार आहे का..?



शहरी नक्षल्यांवर पहिल्यांदाच इतकी कठोर कारवाई झाली आहे याचा आनंद आहे. पण या कारवाईने नक्षलवाद संपणार आहे का..? 
तर याचं उत्तर नकारार्थी आहे, चार दोन नक्षली आत टाकल्याने, त्यांच्यावर खटले भरल्याने नक्षलवाद संपणार नाही. नक्षलवाद हा एक विचार आहे कोणी व्यक्ती नाही. व्यक्ती संपवता येतात पण विचार इतका सहज संपवता येत नाही. आज ढवळे बिवळे आत गेलेत उद्या त्यांच्या जागी दुसरे कावळे येतील पण एक दोन ढवळे आत गेल्याने माओवाद संपणार नाही. त्यांचा एक एक मोहरा आत टाकल्याने ते अजून आक्रमक होतील त्यांच्या विचारांप्रति अजून कट्टर होतील. जर नक्षलवाद मुळातून संपवायचा असेल तर त्याला कारणीभूत असलेल्या आपल्या समाजातील, व्यवस्थेतील त्रुटींना आपण दूर केलं पाहिजे.
कोणी नुसतं माओ मार्क्स वाचून हत्यार हातात घेत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर हा समाज हि व्यवस्था अन्याय करत नाही, त्यांचे हक्क हिरावून घेत नाही तोवर शस्त्र धारण करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नाही. ज्यावेळी सनदशीर शांततापूर्ण मार्गाने न्याय हक्क मिळत नाहीत तेव्हाच माणूस शस्त्र उचलण्याचा मार्ग निवडतो.
आपल्या समाजात प्रचंड विषमता आहे, सामान्य लोकांना न्याय अजूनही दुरापास्त आहे. न्यायव्यवस्था शासनव्यवस्था कशाप्रकारे श्रीमंतांच्या घरी पाणी भरते हे सगळ्यांना माहित आहे.
स्वतः मी आणि माझा परिवार भ्रष्ट न्यायव्यवस्थेचे बळी आहेत. हक्काच्या गोष्टीसाठी 8 वर्ष न्यायालयात खेटे घालत होतो, पण समोरची पार्टी गडगंज पैसा, राजकीय ताकद बाळगून होती. आई वडील प्रचंड तणावातून जात होते, आर्थिक चणचण भासत होती. घरातील एकेक गोष्ट विकून इकडे तिकडे मिळेल ते काम करून चारितार्थ चालू होता. अनेक नेत्यांना पत्र लिहिली, आपलं सरकार वर तक्रार दिली, मोदींना पत्र लिहिलं पण समोरच्या व्यक्तीची ताकद पाहता कोणीच मध्यस्थी करायला तयार नव्हतं. घरच्यांची अवस्था माझ्याने बघवत नव्हती, कित्येकदा वाटायचं एखादी बंदूक घ्यावी आणि सरळ त्याच्या घरात घुसून गोळ्या घालाव्यात. पण दुसरं मन सांगत होतं हा पर्याय असू शकत नाही, आयुष्यात तुला खूप काही करायचं आहे ते एका गोष्टीसाठी संपवण्यात अर्थ नाही. पण माझ्या कल्पनेत मी त्याला आजवर लाखो वेळा गोळ्या घातल्यात, मागच्या आठ वर्षात एकाही रात्री त्याला गोळ्या घातल्याशिवाय झोपलो नाही.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की माझ्या सारखा शिकलेला समतोल विचार करणारा मुलगा जर हातात शस्त्र घेण्याचा विचार करू शकतो तर एखाद्या वस्तीत राहणाऱ्या बेरोजगार तरुणाला शस्त्र उचलायला प्रवृत्त करणं फार अवघड नाही. म्हणून जोवर इथं भ्रष्टाचार आहे, अन्याय आहे तोपर्यंत इथं माओवाद असणार आहे कारण कोणी माओ वाचून माओवादी बनत नाही तर इथली व्यवस्था त्याला माओवादी बनवते. माओ मार्क्स फक्त प्रतीकं म्हणून शिल्लक असतात.
असो 

No comments:

Post a Comment